प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला अखेर यश; शनिवारी सकाळची शाळा पूर्ववत, श्रावण सोमवारी पाच तासिका ठेवण्याचे आदेश

wartaa.in
Share on


अर्जुनी मोरगाव (प्रतिनिधी):
प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया शाखेच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शनिवारी सकाळची शाळा पुन्हा पूर्ववत ७ ते ११.३० या वेळेत भरवण्यात येणार आहे, तर श्रावण सोमवारी ५ तासिका ही पारंपरिक प्रथा सुद्धा पुन्हा लागू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि शिक्षकांचे कार्यसौष्ठव लक्षात घेता, प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनात बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता, शनिवारी सकाळची शाळा पूर्ववत करणे आणि श्रावण सोमवारी पारंपरिक तासिका ठेवण्याची मागणी स्पष्टपणे नोंदवण्यात आली होती.

या मागण्या जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनंथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी आणि शिक्षण समिती सदस्या तूमेश्वरी बघेले यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश येत शिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी करून या मागण्या मान्य केल्या आहेत.

परिपत्रकानुसार, शनिवारची शाळा पुन्हा सकाळी ७ ते ११.३० या वेळेत भरवण्यात येणार असून, श्रावण महिन्यातील सोमवारी पारंपरिक पाच तासिकांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार असून, शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार नाही.

तसेच, बीएलओसारख्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी, अशी शिक्षक संघाची जोरदार मागणी होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

या सर्व निर्णयामुळे शिक्षकांमध्ये समाधानाची भावना असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा मोठा टप्पा पार करण्यात आला आहे. शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *