अर्जुनी मोरगाव उपविभागातील वीज समस्येवर सशक्त उपाय!
३३/११ केव्ही बाराभाटी उपकेंद्राचे भूमिपूजन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते
अर्जुनी मोरगाव (प्रतिनिधी) – ३३/११ केव्ही बाराभाटी उपकेंद्राचे भूमिपूजन नुकतेच आमदार तथा माजी मंत्री इंजी. राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हे उपकेंद्र अर्जुनी मोरगाव उपविभागासाठी वीज वितरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, या माध्यमातून भार व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक होणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार बडोले यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “उपविभागातील वीज ताण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या AG लोडचे व्यवस्थापन मोठे आव्हान होते. मात्र, या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या स्थापनेमुळे हे आव्हान सुकर होणार असून, नागरिकांनाही सतत, स्थिर आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळणार आहे.”
या उपकेंद्रामुळे बाराभाटी परिसरासह संलग्न गावांतील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. परिणामी शेतीसाठी वापरण्यात येणारा विद्युत भार (AG लोड) योग्य रीतीने नियोजित केला जाऊन, शेतकऱ्यांची गैरसोय कमी होईल.
या भव्य कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रंगारी, अधीक्षक अभियंता श्री. राठोड, कार्यकारी अभियंता श्री. नायडू, गोंदिया येथील कार्यकारी अभियंता श्री. रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले. जिल्हा परिषद सदस्या कविताताई कापगते, माजी उपसभापती पं.स. अर्जुनी मोरगाव श्री. होमराजजी पुस्तोडे, पं.स. सदस्या शालिनीताई डोंगरवार, माजी जि.प. सदस्य श्री. किशोरजी तरोणे, तालुकाध्यक्ष श्री. लोकपालजी गहाणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. व्यंकटजी खोब्रागडे, सरपंच सरस्वताताई चाकाटे (बाराभाटी), श्री. किशोरजी बेलखोडे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
या उपकेंद्राच्या स्थापनेमुळे स्थानिक जनतेमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी आमदार राजकुमार बडोले यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या नेतृत्वगुणांचे अभिनंदन केले. हे उपकेंद्र अर्जुनी मोरगाव उपविभागातील वीज समस्या सोडविणाऱ्या महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतीक ठरणार आहे.

