डॉ. पोयाम यांच्यावर मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे गंभीर आरोप

wartaa.in
Share on

गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागात एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या अध्यक्षिका डॉ. पोयाम यांच्यावर मानसिक त्रास, आर्थिक शोषण आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

तक्रारकर्त्या महिला डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्या बराच काळ ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत. ०८/०८/२०२४ पासून त्यांची नियुक्ती गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात झाली. मात्र, या कालावधीत अध्यक्षिका डॉ. निकिता पोयाम यांनी कामकाजात अडथळे निर्माण करून वारंवार मानसिक दडपण दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, विविध वरिष्ठांच्या बैठकीत व एमएस मिटिंगमध्ये तक्रारकर्त्यांना जाणूनबुजून कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, बदली करून अन्यत्र पाठविण्याची धमकी दिली गेली. एवढेच नव्हे तर, एमएस मिटिंगमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करून प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिवाय, तक्रारकर्त्यांनी स्पष्ट केले की, त्यामुळं त्यांनी पुर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहबे साहेब यांना आपल्या त्रासाबाबत तोंडी सांगितले. त्यावेळी डॉ. मोहबे यांनी या प्रकरणात स्पष्टपणे म्हटले की, “एमएस मॅडम यांनी अधिकाराचा दुरुपयोग करू नये.” मात्र, या सूचना असूनही डॉ. पोयाम यांनी तक्रारकर्त्यांना आणखी जास्त त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद आहे की, एप्रिल, मे व जून २०२५ या तीन महिन्यांचा पगार जाणीवपूर्वक अडविण्यात आला. कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, अनुदान उपलब्ध असून वेतन रोखण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, संबंधित वेतन लिपिकांना विचारणा केली असता समोर आले की, “एमएस मॅडम यांनी डॉ. राऊत सर, डॉ. उईके सर आणि तक्रारकर्त्यांचा पगार काढू नये असे आदेश दिले आहेत.” त्यानंतर तक्रारकर्त्यांना थेट मॅडमना भेटा असे सांगण्यात आले.

डॉ. पोयाम यांच्यावर केवळ मानसिक त्रासच नव्हे तर आर्थिक शोषणाचेही आरोप करण्यात आले आहेत. मार्गदर्शन शुल्क व अन्य स्वरूपात पैशांची मागणी केली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “माझ्याकडून संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, एसी मशीन यांसारख्या महागड्या वस्तू घेण्याची जबरदस्ती करण्यात आली.”

तक्रारकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, “मी २१ वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावली आहे. मात्र, कधीही अशी अपमानास्पद परिस्थिती उद्भवली नव्हती. डॉ. पोयाम यांच्या वागणुकीमुळे आणि दबावामुळे माझ्या सेवेला काळिमा फासला गेला आहे.”

या प्रकरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या अध्यक्षिका डॉ. निकिता पोयाम यांच्यावर झालेले आरोप जर खरे ठरले तर ते मोठे प्रकरण ठरू शकते. आता या तक्रारीवर आरोग्य विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *