अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव संवाद दौरा सुरू

wartaa.in
Share on

पहिल्या दिवशी तीन गावांचा समावेश

अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या, अडचणी आणि विकासासंबंधी मागण्या थेट गावपातळीवर जाऊन ऐकण्यासाठी अर्जुनी-मोरगावचे आमदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गाव संवाद दौऱ्याला सुरुवात केली आहे.

या संवाद दौऱ्याचा उद्देश म्हणजे लोकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करणे. अनेक वेळा ग्रामपातळीवरील प्रश्न कार्यालयीन प्रक्रियेत अडकून राहतात. मात्र, आमदार बडोले यांनी थेट गावात येऊन प्रशासनासमवेत ग्रामस्थांशी संवाद साधून प्रश्न सोडवण्याचा नवा पायंडा घातला आहे.

या उपक्रमाची सुरुवात मतदारसंघातील चान्ना/बाकटी, सिलेझरी आणि निमगाव या गावांपासून झाली. दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, शेतीसंबंधी सुविधा, आरोग्य सेवा, शाळा आणि शासकीय योजनांतील अडचणींबाबत सविस्तर मांडणी केली. आमदार बडोले यांनी या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.

या संवाद दौऱ्यात अनेक मान्यवर आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य यशवंतजी गणवीर, उपसभापती संदिपजी कापगते, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य होमराजजी पुस्तोड, पंचायत समिती सदस्य नाजूकजी कुंभरे, पुष्पलताताई दृगकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी वरुणकुमारजी शहारे, तहसीलदार अनिरुद्धजी कांबळे, उपविभागीय अभियंता समीरजी बनसोडे, गटविकास अधिकारी पल्लवीताई धनविजे, महावितरण अधिकारी पाटीलजी आदी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या समस्यांची नोंद केली. काही ठिकाणी तर जागेवरच तोडगे काढण्यात आले.

स्थानिक सरपंच, उपसरपंच, संस्थांचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्पंच चान्ना सचिनकुमार डोंगरे, सर्पंच सिलेझरी लताताई भेंडारकर, सर्पंच निमगाव वंदेश्वरीताई राऊत यांनी आपल्या गावातील प्रश्न मांडले.

आमदार राजकुमार बडोले यांनी संवादादरम्यान स्पष्ट केले की,
“ग्रामपातळीवरील समस्या तातडीने सोडवणे ही माझी जबाबदारी आहे. प्रशासनाने जनतेच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात, यासाठी मी थेट जनतेमध्ये आलो आहे. विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ देणार नाही.”

या संवाद दौऱ्यामुळे ग्रामीण भागात आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना आपल्या समस्यांचा थेट आमदार आणि अधिकाऱ्यांपुढे उच्चार करण्याची संधी मिळत असल्याने जनतेमध्ये विश्वास वाढला आहे.

हा गाव संवाद दौरा मतदारसंघातील इतर गावांमध्येही पुढील काही दिवस चालू राहणार आहे. प्रत्येक गावातील समस्या प्राधान्याने सोडवून अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा आमदार बडोले यांचा निर्धार स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *