पिंडकेपार गावात उद्यापासून दारूबंदी
थानेदारांच्या हाताला राखी बांधून जनतेने दिला अनोखा संदेश
साकोली तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत उद्यापासून संपूर्ण गावात दारूबंदी लागू होणार आहे. आज, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा पिंडकेपार येथे या विषयावर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत ग्रामपंचायत सरपंच नंदुभाऊ समरित, उपसरपंच सुरेशजी कवरे, ग्रामपंचायत सदस्य सौ गोमती किशोर खोब्रागडे, सौ ममता रामेश्वर भुजाडे, ज्ञानीरामजी समरित, रत्नाकर निंबेकर, तसेच ग्रामविकास अधिकारी चोपकर मॅडम उपस्थित होते. याशिवाय पोलिस पाटील प्रमोद भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष ऋषी येरणे आणि गावातील बहुसंख्य महिला व पुरुष नागरिक देखील उपस्थित होते.
ग्रामसभेत संपूर्ण गावात दारूबंदीसाठी बहुसंख्य लोकांच्या सहमतीने ठराव पारित करण्यात आला. ठरावानंतर, गावातील महिलांनी नारेबाजी करून गावात फिरून दारु विकणाऱ्यांना सूचना दिल्या. साकोली पोलीस स्टेशनचे थानेदार श्री एम.पी. आचरेकर यांनी त्वरित फोनवरून येऊन या ठरावाची शास्वती दिली आणि सांगितले की, गावात दारूबंदी होईल, परंतु लोकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये.
या उपक्रमातून गावातील शिस्तीला बळकटी मिळणार असून, दारूबंदी जनसहयोगाने राबवून गावात सुशासन आणले जाईल. याचसोबत गावातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आणि अभ्यासिका कक्ष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भविष्यातील अभ्यासू विद्यार्थी कलेक्टर किंवा एस.पी. म्हणून उदयास येऊ शकतील.
कार्यक्रमात पोलिस पाटील प्रमोद भोयर यांनी थानेदार साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तिरथराम शहारे महाराज यांनी केले. उपस्थित महिलांनी थानेदार साहेबांना सांगितले की, गावातील दारुदुकानांमुळे कुटुंबांमध्ये होणारे वाद व झगडे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि दारूबंदी अनिवार्य असल्याचे ठामपणे सांगितले.
विशेष असा विश्वासाचा धागा निर्माण करण्यासाठी, ग्रामपंचायत सदस्य सौ ममता ताई भुजाडे यांनी थानेदार साहेबांच्या हाताला राखी बांधून, दारुदुकानांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनीही राखीचा उत्सव साजरा करून बंधुत्वाची प्रतिकृती सादर केली. थानेदार साहेब भारावून गेले आणि सांगितले की या बहिण भावाच्या नात्याला मजबूत करून गावात दारूबंदी प्रभावीपणे राबवली जाईल.
कार्यक्रमाचा समारोप करताना ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी व गावातील नागरिकांसमोर ग्रामसभेचा ठराव जाहीर केला गेला. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भुजाडे, अंगराजजी समरित, किशोर खोब्रागडे, शिवचरण वडीकार, दिगांबर येरणे, एकानंद वालदे यांचा विशेष सहभाग लाभला. सौ ममता ताई भुजाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
उद्यापासून पिंडकेपार गावातील सर्व दारू विक्री पूर्णपणे बंद राहणार असून, गावातील सुरक्षितता, शिस्त, आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम मीलाचा दगड ठरणार आहे.

