अर्जुनी-मोर. तालुका हादरला : एकाच दिवशी तीन गावांत तीन युवकांचे दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण परिसरात शोककळा
अर्जुनी-मोर. तालुका हादरला असून गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ हा दिवस तालुकावासीयांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि काळजाला चटका लावणारा ठरला आहे. तालुक्यातील ताडगाव, धाबेटेकडी/आदर्श आणि मोरगाव या तीन वेगवेगळ्या गावांतील तीन तरुणांचा एकाच दिवशी वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्याने संपूर्ण अर्जुनी-मोर. तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनांमुळे तालुका हादरून गेला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना अर्जुनी-मोर. रेल्वे स्थानक परिसरात घडली. तालुक्यातील ताडगाव येथील संदीप वसंत नाकाडे (वय ४२) या विवाहित युवकाने गोंदिया–चंद्रपूर मार्गावरील मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. संदीप नाकाडे हे अर्जुनी-मोर. येथे कृषी केंद्र चालवत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असून पत्नी, मुले व नातेवाईकांचा आधार हरपला आहे. ताडगाव गावात या घटनेनंतर शोककळा पसरली असून नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दुसरी दुर्दैवी घटना अर्जुनी-मोर. तालुक्यातील धाबेटेकडी / आदर्श येथे घडली. येथील नंदेश्वर गजानन कापगते (वय ३५) या विवाहित युवकाचा शेतातील विद्युत डीपीजवळ विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाबेटेकडी गावात हळहळ व्यक्त केली जात असून शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन्ही घटनांतील मृतदेह अर्जुनी-मोर. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. यावेळी मृतकांचे नातेवाईक, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालय परिसरात आक्रोश आणि शोक व्यक्त होत होता. या प्रकरणांचा सखोल तपास अर्जुनी-मोर. पोलीस स्टेशनमार्फत सुरू असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
तिसरी घटना ही रस्ता अपघाताची असून ती साकोली तालुक्यातील चारगाव फाट्याजवळ घडली. मोरगाव (ता. अर्जुनी-मोर.) येथील दुर्गेश वामन चौधरी (वय २८) हा अविवाहित युवक काही कामानिमित्त दुचाकीने साकोली तालुक्यातील नातेवाईकांकडे गेला होता. ७ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात दुर्गेश चौधरी याचा जागीच मृत्यू झाला. तरुण वयातच काळाने झडप घातल्याने मोरगाव गावात शोककळा पसरली आहे.
अर्जुनी-मोर. तालुक्यात एकाच दिवशी तीन युवकांचे मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. जीवनाच्या अनिश्चिततेची जाणीव करून देणाऱ्या या घटनांनी नागरिकांना सुन्न केले असून तिन्ही गावांत शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

