गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट

wartaa.in
Share on

गोंदिया कचारगड यात्रा या आदिवासी बांधवांच्या आस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री श्री. संजय भोयर यांनी आज गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गोंदिया येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देत जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

या महत्वपूर्ण बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल तसेच पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी कचारगड यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

राज्यमंत्री श्री. भोयर यांनी सांगितले की, सालेकसा तालुक्यातील कचारगड हे आदिवासी समाजाचे अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान आहे. येथे 1986 पासून सातत्याने पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीची यात्रा भरविण्यात येते. यावर्षी ही यात्रा 30 जानेवारीपासून सुरू होणार असून सलग पाच दिवस चालणार आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा यांसारख्या विविध राज्यांतून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात.

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहणार असल्याने कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्ण दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री भोयर यांनी दिले. यात्रेदरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची विशेष काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी अधोरेखित केले.

भाविकांच्या मूलभूत सुविधांवर भर देताना त्यांनी सांगितले की, यात्रास्थळी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छ व सुरक्षित टॉयलेट सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवक, माहिती कक्ष व दिशादर्शक फलक लावण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कचारगड यात्रेदरम्यान सी-60 चे तीन विशेष पथक तैनात राहणार आहेत. तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव प्रमोद मडामे व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 300 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी कार्यरत राहतील.

वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असून ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली. यात्रेच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

गोंदिया कचारगड यात्रा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि ऐक्याचे प्रतीक आहे. त्यामुळे ही यात्रा शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात पार पडावी, यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन राज्यमंत्री भोयर यांनी शेवटी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *