महाराष्ट्रात प्रशासकीय विकेंद्रीकरण; चार ठिकाणी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये
स्थान: Mumbai
महाराष्ट्रातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद गतीने व स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार, तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाकडून या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार राज्यातील चार प्रमुख ठिकाणी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यासोबतच २१ जिल्ह्यांमध्ये एकूण ४७ नवीन अपर तहसील कार्यालयांची निर्मिती देखील केली जाणार आहे. या व्यापक प्रशासकीय पुनर्रचनेमुळे राज्यातील महसुली कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा सतत वाढता व्याप, उपलब्ध असलेला अपुरा अधिकारी व कर्मचारीवृंद, तालुके आणि जिल्ह्यांचे परस्परांमधील मोठे भौगोलिक अंतर, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय आणि महसुली सेवांसाठी आता जिल्हा मुख्यालयांपर्यंत लांबचा प्रवास करावा लागतो. हा त्रास वाचवण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन कार्यालयांच्या स्थापनेमुळे तहसील व जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध महसुली सेवा नागरिकांना त्यांच्या अगदी जवळ आणि सुलभपणे उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कामांना आणि कागदपत्रांच्या मंजुरीला अधिक गती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन केली जाणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापैकी पंढरपूर येथील नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत एकूण सात तालुक्यांचा प्रशासकीय कारभार पाहिला जाणार आहे. यात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, करमाळा आणि मोहोळ या सात तालुक्यांचा समावेश असून, या परिसरातील नागरिकांची मोठी सोय यामुळे होणार आहे. यापूर्वी पंढरपूर परिसरातील नागरिकांना आपल्या विविध प्रशासकीय कामांसाठी थेट सोलापूर जिल्ह्याच्या मुख्यालयात जावे लागायचं, ज्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता. आता नवीन रचनेनुसार, सोलापूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट हे चार तालुके राहतील, तर उर्वरित सात तालुक्यांचा कारभार पंढरपूर येथून चालवला जाईल. या नवीन सर्व कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदांची पदस्थापना शासनस्तरावरून तातडीने केली जाणार आहे. या सर्व नवीन कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न थेट स्थानिक पातळीवरच मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांवर स्वागत होत असून, यामुळे शासकीय यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल असा विश्वास प्रशासकीय वर्तूळात व्यक्त केला जात आहे. आता या नवीन कार्यालयांच्या प्रत्यक्षात येण्याने आणि कामकाज सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशासकीय विभाजनामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे महसूल कार्यालयाशी संबंधित अनेक प्रश्न आणि कामे आता जलद गतीने सुटण्यास मदत होईल यात शंका नाही.

