अर्जुनी -मोर येथील व्यायाम साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी ! सुधांशु मेहता

Share on

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.

अर्जुनी मोरगावातील व्यायाम साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीअंतर्गत विविध खुल्या जागांमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी व युवकांना व्यायामाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र, या साहित्याच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी व आक्षेप उपस्थित होत असल्याने संबंधित कामाची सखोल तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नयन रुखमोड,दिशांत अंबुले,अर्जुनी मोरगावच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या व्यायाम सुविधांचा उद्देश नागरिकांना सुरक्षित, टिकाऊ व दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, बसविण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, कामाच्या अंदाजपत्रकातील तरतुदी, तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि शासनाने निर्धारित केलेल्या आवश्यक स्पेसिफिकेशन्सचे पालन झाले आहे किंवा नाही, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत तपासणी करण्याची मागणी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या प्रकरणात तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. नगरपंचायत क्षेत्रातील खुल्या जागांमध्ये बसविण्यात आलेल्या संपूर्ण व्यायाम साहित्याची स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. तसेच कामाचे प्रशासकीय मान्यता आदेश, मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, पुरवठा आदेश, साहित्याचे स्पेसिफिकेशन्स, गुणवत्ता प्रमाणपत्रे, देयके आणि मोजमाप पुस्तिकांची तपासणी करण्यात यावी.

याशिवाय, मंजूर अंदाजपत्रक व शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार साहित्य बसविण्यात आले आहे किंवा नाही, याचा पडताळणी अहवाल तयार करून तो सार्वजनिक करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सार्वजनिक निधीच्या वापरात पारदर्शकता आवश्यक

सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये गुणवत्ता आणि नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. व्यायाम साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

आता नगरपंचायत प्रशासन या मागणीची दखल घेऊन चौकशी करते का आणि व्यायाम साहित्याच्या गुणवत्तेबाबत वस्तुस्थिती समोर आणते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *