खासदार प्रफुल्ल पटेल यांचा १५ व १६ ऑक्टोबरला भंडारा-गोंदिया जिल्हा दौरा..
वार्ताहर : अजय शहारे | गोदिया
खासदार प्रफुल्ल पटेल यांचा १५ व १६ ऑक्टोबरला भंडारा-गोंदिया जिल्हा दौरा; नवरात्रोत्सव मंडळांना देणार भेटी
गोंदिया : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल हे १५ व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन माँ दुर्गा उत्सव समित्या, रास गरबा मंडळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
१५ ऑक्टोबर रोजी भंडारा व लाखनी दौरा
गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता खासदार प्रफुल्ल पटेल श्री हनुमान देवस्थान, चांदपूर येथे दर्शनासाठी पोहोचतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता मोहाडी शहरातील माँ चोंडेश्वरी माता मंदिरात दर्शन घेतील.
सायंकाळी ६.३० वाजता भंडारा शहरातील विविध माँ दुर्गा मंडळांना भेटी देणार असून, यामध्ये शीतला माता मंदिर, खांब तलाव रोड, बालमित्र दुर्गोत्सव मंडळ, गांधी चौक आणि अन्नपूर्णा माता मंदिर, बडा बाजार आदी ठिकाणांचा समावेश आहे.
रात्री ८.३० वाजता लाखनी शहरातील समर्थ ग्राउंड (मुरमाडी) येथे श्रृष्टी फाउंडेशनतर्फे आयोजित रास गरबा उत्सवाला ते उपस्थित राहतील. रात्री ८.४५ वाजता लाखनी येथील माँ दुर्गा नवरात्रोत्सव, भव्य जागराता व लाखोरी रोडवरील उत्सव मंडळांना भेट देतील. रात्री ९.३० वाजता साकोली शहरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन श्री शिवदुर्गा मंदिर, जुने पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात दर्शनासाठी जाणार आहेत.
१६ ऑक्टोबर रोजी गोंदिया शहरातील मंडळांना भेटी
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत खासदार प्रफुल्ल पटेल हे रामनगर, बगीचा परिसरातील आपल्या निवासस्थानी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
सायंकाळी ७.३० वाजल्यापासून गोंदिया शहरातील विविध माँ दुर्गा उत्सव समित्या आणि रास गरबा मंडळांना भेटी देणार आहेत. यामध्ये राजलक्ष्मी चौक, गुढा टोली, मनोहर चौक, गांधी प्रतिमा चौक, सुभाष स्कूल परिसर, शिवमंडळ शंकर चौक, सिंधी कॉलनी, माँ जगदंबा धाम, टॉकीज चौक तसेच गुजराती समाजाच्या विविध नवरात्रोत्सव मंडळांचा समावेश आहे.
खासदार राजेंद्र जैनही राहणार उपस्थित
या दौऱ्यादरम्यान खासदार राजेंद्र जैन हेदेखील खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी देण्याबरोबरच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे.
या सर्व कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

