वन्हाडघाटात वाघाचा धुमाकूळ; गाईची शिकार!
वार्ताहर : अजय शहारे | देवरी
वन्हाडघाटात वाघाचा धुमाकूळ; गाईची शिकार!
खेडबुड्डी तलाव परिसरात वाघाचा हल्ला; शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
देवरी, दि. १७ ऑक्टोबर २०२६ :
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर बांध अंतर्गत येणाऱ्या वन्हाडघाट जंगल परिसरात वाघाने गाईची शिकार केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. खेडबुड्डी तलाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जंगल परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला केला. या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला. परिसरातील पशुपालक रामदास कोर्राम हे आपली गुरे चराईसाठी जंगल परिसरात घेऊन गेले असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
धान कापणीच्या हंगामात चिंता वाढली
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांची शेतातील वर्दळ वाढत आहे. अशा परिस्थितीत जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरांच्या शिकारीमुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात
या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. वनविभागाने परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
धान कापणीच्या काळात शेतकऱ्यांना शेतात जाणे आवश्यक असल्याने वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

