आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाने महाड सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा!

आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाने महाड सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा!
Share on

वार्ताहर : अजय शहारे | नागपुर

आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाने महाड सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा!
नागपुरातील वसंत देशपांडे सभागृहात प्रयोग; टाळ्या, हुंकार अन् अनेकांच्या डोळ्यांत अश्रू

नागपूर | दि. १६ ऑक्टोबर २०२६
आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचा प्रयोग नागपुरातील वसंत देशपांडे सभागृहात सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी टाळ्या, हुंकार आणि भावूक प्रतिसादातून नाटकाला दाद दिली. अनेकांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हे केवळ अभिनयाचे कौतुक नव्हते, तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाशी, स्वाभिमानाशी आणि सामाजिक समतेच्या विचारांशी जोडलेल्या भावनांचे प्रतीक होते.
२० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा लढा नव्हता, तर मानवी प्रतिष्ठा, समानता आणि स्वाभिमानासाठीचा ऐतिहासिक संघर्ष होता. ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकातून हा इतिहास रंगमंचावर जिवंत करण्यात आला. सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा बाबासाहेबांचा विचार या प्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आला.

युवा पिढीसाठी समतेचा प्रेरणादायी संदेश

आजच्या युवा पिढीने बाबासाहेबांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचा जीवनात स्वीकार करणे गरजेचे आहे. शिक्षण, संघटन, संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक समता या मूल्यांतून न्याय्य समाजाची निर्मिती होऊ शकते. जातिभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध वैचारिक लढा उभारण्याचा संदेश या नाटकातून देण्यात आला. पाणी हे केवळ जीवनाचे साधन नसून समान हक्कांचे प्रतीक असल्याची जाणीवही नाटकातून अधोरेखित झाली.

कलाकारांच्या अभिनयाला उत्स्फूर्त दाद

नाटकात शशांक पांबाळ, अजित रांजणे, मयुरेश मर्दा, अमोल जाधव, प्रेम जेटीथोर, प्रांजल परब, सायली नंदा, राजू मिलारे, तेजस राजे, मयुरी निकम, महादेव जाधव आणि मृणाल किस्मतवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांनी प्रभावी अभिनयातून नाटकाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला.

किरणन्स एलएलपी प्रस्तुत या नाटकाचे लेखन आमदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. शारदा राजकुमार बडोले निर्मितीशी संबंधित असून, गणेश कु. मोकासे सहनिर्माते आहेत. नाटकाचे दिग्दर्शन मंदार देशपांडे यांनी केले आहे.

महाड सत्याग्रह हा संपूर्ण मानवजातीचा संघर्ष

महाड सत्याग्रह हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या हक्कांसाठीचा संघर्ष आहे. या ऐतिहासिक लढ्याच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाटकाच्या माध्यमातून त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
नाटकाच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांनी महाड सत्याग्रहाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी नाटकाचे लेखक तथा माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले, शारदा राजकुमार बडोले, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सोरते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाने सामाजिक समता, मानवी हक्क आणि स्वाभिमानाचा विचार प्रभावीपणे मांडत नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. बाबासाहेबांच्या संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा नाट्यप्रयोग महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *