शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३० वर्षीय युवकाचा मृतदेह
वार्ताहर : अजय शहारे | अर्जूनी/मोर – सिरोली
शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३० वर्षीय युवकाचा मृतदेह
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, अर्जुनी मोरगाव पोलिसांत नोंद
: गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरोली शिवारात एका ३० वर्षीय युवकाने स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ता. 18 ऑक्टोबर च्या सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनिल पवार ( वय 30) असे मृत तरुणाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अनिल पवार हे सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता होते. बराच वेळ शोध घेऊनही ते न मिळाल्याने त्यांचे मोठे बंधू सुनील पवार शोध घेत शेताकडे पोहोचले. त्यावेळी शेताजवळ अनिल यांची दुचाकी उभी असलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता, अनिल पवार यांचा मृतदेह निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत अर्जुनी मोरगाव पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अर्जुनी मोरगाव येथील रुग्णालयात पाठवला.
अनिल पवार यांनी हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

