डव्वा निवासी शाळेत डुग्गीपार पोलिसांतर्फे विशेष कार्यशाळा.

डव्वा निवासी शाळेत डुग्गीपार पोलिसांतर्फे विशेष कार्यशाळा.
Share on

वार्ताहर : अजय शहारे | सडक/अर्जुनी

डव्वा निवासी शाळेत डुग्गीपार पोलिसांतर्फे विशेष कार्यशाळा.
सायबर सुरक्षा, महिला हक्क आणि स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन.

सडक अर्जुनी : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, डव्वा येथे विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा तसेच महिला सुरक्षा या विषयांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक रुपाली पवार, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश शेजाळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम सर यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थिनींनी सुरुवातीपासूनच स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

डिजिटल युगातील वाढत्या सायबर धोक्यांची जाणीव करून देताना ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक्स, ओटीपी व पासवर्डची गोपनीयता, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि संशयास्पद संदेशांपासून सावध राहण्याबाबत सांगण्यात आले. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

तसेच महिला सुरक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थिनींना त्यांचे हक्क, कायदे, स्वसंरक्षण आणि संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळविण्याच्या उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या. कोणताही छळ किंवा अन्याय मुकाट्याने सहन न करता पालक, शिक्षक आणि पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास आणि विविध विषयांवर सजगता निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस हवालदार सुशील रामटेके, दिलीप हातझाडे, महेंद्र सोनवाने, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम देशमुख, महिला पोलीस शिपाई सुषमा कनपुरिया तसेच शाळेतील शिक्षक बाटबर्वे, वाघमारे, तेलंग मॅडम, श्रीरंगे, उईके, झोडे मॅडम आणि दरवळे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *