शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत हा अंतिम निर्णय नाही : खा. प्रफुल पटेल.
वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया
शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत हा अंतिम निर्णय नाही : खा. प्रफुल पटेल
विरोधकांनी सरकार पडण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आधी स्वतः एकत्र येऊन दाखवावे.
गोंदिया : १६ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील आपल्या निवासी कार्यालयात उपस्थित असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक (उड्डाण) मंत्री प्रफुल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नियोजन राज्य सरकारकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या शहरांमध्ये पाणीकपात करावी लागली तरी प्रत्येक स्तरावर नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत ही तातडीची आणि तात्पुरती असून, तो अंतिम निर्णय नाही. यापूर्वी सरकारने २ लाख रुपयांची कर्जमाफी केली असून, येत्या काळात दुष्काळाची तीव्रता वाढल्यास परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना आणखी योग्य मदत दिली जाईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
आगामी पाचही निवडणुकांमध्ये महायुतीला पूर्ण यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडणुका जाहीर झाल्यावर महायुती धर्म पाळून तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. पुणे मतदारसंघातील सचिन सानप यांच्या उमेदवारीवरून विरोधक महायुतीत मतभेद असल्याच्या अफवा पसरवून केवळ दिशाभूल करत आहेत; प्रत्यक्षात महायुतीतील तिन्ही पक्ष पूर्णपणे एकत्र आहेत.
महायुती सरकार कोसळण्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पटेल म्हणाले की, विरोधकांनी आधी स्वतः एकत्र येऊन दाखवावे. दिल्लीत विरोधी आघाडीच्या बैठकीत अनेक पक्ष केवळ हजेरी लावून निघून जातात, त्यांच्यात कोणतीही एकी नाही. महाराष्ट्रातही विरोधकांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले असून त्यांचे विचार जुळत नाहीत. वित्त विभागाच्या जबाबदारीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, खातेवाटपाबाबत महायुतीमध्ये आधीच चर्चा झाली होती. नेत्याच्या निधनामुळे काही तात्पुरती ॲडजस्टमेंट करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी यावर सविस्तर चर्चा केली असून, लवकरच मुख्यमंत्री यावर योग्य निर्णय घेतील.

