टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सलमान खान कॅमेऱ्यासमोर; पापाराझींना दिली प्रतिक्रिया

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सलमान खान कॅमेऱ्यासमोर; पापाराझींना दिली प्रतिक्रिया
Share on

वार्ताहर : Super Admin | महाराष्ट्र

गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानची पहिली सार्वजनिक उपस्थिती

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून सलमान खानच्या सुरक्षेतही तातडीने वाढ करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खान पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात कॅमेऱ्यासमोर आला.

जानेवारी महिन्यात अबु धाबी येथे होणाऱ्या 'आयफा पुरस्कार सोहळा २०२७' च्या निमित्ताने मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला सलमान खानने उपस्थिती दर्शवली. यावेळी निळा सूट, टीशर्ट, जीन्स आणि गॉगल अशा वेशात तो दाखल झाला होता. पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्यानंतर सलमान म्हणाला, "मित्रांनो, बॅक अँगलचं जरा लक्षात ठेवा.. इतका आदर तर सर्वांना देऊच शकता."

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात तिघांना अटक

टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत भररस्त्यात झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली आहेत. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींना कोटा येथून ताब्यात घेतले आहे. हे तिन्ही संशयित शूटर ट्रेनने दिल्लीच्या दिशेने प्रवास करत असताना ही कारवाई करण्यात आली. सलमान खानने अद्याप या गोळीबार प्रकरणावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

अनिल पंडितचा कथित ऑडिओ मेसेज आणि धमकी

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अनिल पंडित नावाच्या इसमाचा एक नवा कथित ऑडिओ मेसेज समोर आला आहे. या ऑडिओमध्ये त्याने बॉलिवूड आणि सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

त्याने म्हटले आहे की, बॉलिवूडमधील अभिनेते पाकिस्तान आणि दुबईत बसलेल्या दाऊदच्या पैशातून चित्रपट बनवतात आणि त्याला नफा मिळवून देतात. तो पैसा देशाच्या विरोधात वापरला जातो, असा आरोप त्याने केला. दाऊदच्या कृत्यांवर प्रशासनाने कारवाई केली नाही आणि आता आम्ही पाऊल उचलल्यावर प्रशासन आमच्या मागे लागले आहे, असा दावाही त्याने केला.

तसेच सलमान खानचा उल्लेख करत त्याने म्हटले आहे की, जोपर्यंत सलमान माफी मागत नाही, तोपर्यंत त्याचा पाठलाग सोडला जाणार नाही आणि त्याचे जगणे कठीण केले जाईल. प्रशासनाने त्याला माफी मागायला सांगावे; जर त्याने माफी मागितली, तर आमचा कोणताही वाद राहणार नाही, असा इशारा या ऑडिओ मेसेजमध्ये देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *