लाखो रुपये दिले तरी प्रवक्तेपद स्वीकारणार नाही; विवेकानंद पाटील यांचे स्पष्टीकरण
वार्ताहर : Super Admin | महाराष्ट्र
लाखो रुपये दिले तरी प्रवक्तेपद स्वीकारणार नाही; विवेकानंद पाटील यांचे स्पष्टीकरण
पुण्यातील एमपीएससी आंदोलनाचे नेतृत्व करून चर्चेत आलेले विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विविध राजकीय पक्षांकडून आपल्याला प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या; मात्र कुणी कितीही लाखो रुपये दिले, तरी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता होणार नाही आणि राजकारणात जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
राजकारणात जाण्याचे कोणतेही वेध नाहीत
सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना विवेकानंद पाटील म्हणाले की, "मला राजकारणाचे कोणतेही वेध लागलेले नाहीत. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसतील, तर मग राजकारणात येऊ द्या, असे विधान मी केवळ उपरोधाने केले होते. राजकारणातच जायचे असते, तर विविध पक्षांकडून प्रवक्तेपदाच्या आलेल्या ऑफर्स मी स्वीकारल्या असत्या. मात्र, मला जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरूनच करत राहीन."
एमपीएससी आंदोलन सध्या केवळ स्थगित केले असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शासनाला सावध केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने चुकीची पावले उचलल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही पाटील यांनी दिला.
तरुणाईच आधुनिक महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबाबत विवेकानंद पाटील म्हणाले की, "मी लढताना विद्यार्थ्यांसमोर लढलो आणि त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांसमोरच आलो आहे. आधुनिक महाराष्ट्र घडवायचा असेल आणि सुसंस्कृत भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर मला तरुणच केंद्रस्थानी वाटतात. तरुणांना भेटून मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे काम मी करत राहीन. तरुणांनी मला आमंत्रित केले, त्यामुळे मी त्यांच्यासाठी उपस्थित राहिलो असून त्यांच्या प्रश्नांसाठी कायम उभा राहीन."
जगण्यासाठी फक्त राजकारण किंवा एमपीएससी हे दोनच मार्ग नसून वक्तृत्व, कला, क्रीडा, संगीत यासह हजारो वाटा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा आमटे यांच्या विचारांचा संदर्भ देत, समाजकारणाचे जहाज आपण सोडणार नाही आणि प्रशासनाबाहेर राहूनही लोकांची सेवा करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आंदोलनाला शुभेच्छा
दिल्लीतील आंदोलनाबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, कोणत्याही लढ्याला पहिल्याच दिवशी यश मिळत नाही. आम्ही ११ दिवस आंदोलन केले, तेव्हा कुठे थोड्याफार प्रमाणात यश मिळाले. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा अजूनही झालेला नाही. आम्ही संविधानाचा मार्ग अवलंबला आहे. दिल्लीतील आंदोलकांच्या मागण्या आणि आमची मागणी वेगळी आहे. दोन्ही लढ्यांची तात्त्विक बैठक वेगळी असून त्यांचे कार्यक्षेत्र देशपातळीवर तर आमचे कार्यक्षेत्र सध्या महाराष्ट्र आहे. दिल्लीतील आंदोलकांना आपल्या पूर्ण शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

