बुद्धाचा धम्म हा आचरणात आणला पाहिजे – आमदार राजकुमार बडोले ;
वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र
बुद्धाचा धम्म हा आचरणात आणला पाहिजे – आमदार राजकुमार बडोले ;
चिचटोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात
अर्जुनी/मोर.
भारतीय इतिहासाला वैभवशाली परंपरा लाभली असून, या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर मानवतेचा लढा दिला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देत त्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले. भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा केवळ विचारांचा किंवा उपदेशाचा धम्म नसून तो आचरणाचा धम्म आहे. त्यामुळे बुद्धांचे विचार आत्मसात करण्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनातही परिवर्तन घडवून आणले पाहिजे. बुद्धांचा धम्म माणसामाणसांत भेदभाव करीत नाही, तर समता, करुणा आणि बंधुभावाची शिकवण देतो, असे मौलिक प्रतिपादन माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.तालुक्यातील चिंचटोला-कोसमतोंडी येथे चंद्रमुणी बुद्ध विहार समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन इंजि. साहेबलाल मेश्राम यांच्या हस्ते झाले.
मार्गदर्शन करताना आमदार बडोले पुढे म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांनी मानवतेला शांती, करुणा, प्रज्ञा आणि समतेचा मार्ग दाखविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विचारांच्या आधारावर सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता आले पाहिजे, कोणावरही अन्याय होऊ नये आणि माणसामाणसांतील भेदभाव नष्ट व्हावा, हीच या महापुरुषांच्या विचारांची खरी शिकवण आहे. त्यामुळे धम्म केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्यातील विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, सरपंच निर्मलाताई कापगते उपसरपंच मुनेश्वर कापगते, भैय्यालाल पुस्तोडे, प्राध्यापक राहुल तागडे, चंद्रमुनी बुद्ध विहार समितीच्या अध्यक्ष अनिताताई बांबोडे, ग्राम महसूल अधिकारी राजकुमार बांबोडे, शिक्षक सी एस वैद्य, डॉक्टर दिलीप कापगते उपसरपंच जनार्धन डोंगरे, नागसेन वैद्य नरेंद्र वैद्य सचिन येसनसुरे, प्रीतीताई भीमटे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील राजानंद बांबोडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी व समाज बांधव उपस्थित होते.

