शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत गोंदियातील ६०१ शेतकऱ्यांचा समावेश.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत गोंदियातील ६०१ शेतकऱ्यांचा समावेश.
Share on

वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत गोंदियातील ६०१ शेतकऱ्यांचा समावेश.
४ कोटी २८ लाखांहून अधिक कर्जमाफी मंजूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांतील पात्र लाभार्थ्यांचा समावेश.

लाभ मिळवण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन.
गोंदिया (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या चौथ्या यादीत गोंदिया जिल्ह्यातील ६०१ पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी एकूण ४ कोटी २८ लाख ९४ हजार २६८ रुपयांची कर्जमाफीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बँकनिहाय आकडेवारीनुसार, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौथ्या यादीत ३०५ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्यासाठी १ कोटी ७२ लाख २३ हजार ३२० रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. तसेच इतर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील २९६ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ५६ लाख ७० हजार ९४७ रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ६०१ शेतकरी या चौथ्या टप्प्यात कर्जमुक्त होणार आहेत.

शासन निर्णयानुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत राहिलेले, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीक कर्ज व पुनर्गठित कर्जास २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत खात्यांची नोंद केली होती. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या तीन याद्यांमध्ये मिळून राज्यातील २४ लाख ६७ हजार १३० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख लाभार्थ्यांना १३ हजार २७५ कोटी रुपयांचे वाटप थेट कर्जखात्यांवर करण्यात आले आहे.

२२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीक कर्ज खाते असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या राज्यातील १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी विचारात घेतलेली कर्जबाकी ३१ मार्च २०२६ पर्यंतची असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च शासन नियमानुसार माफ करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व संबंधित पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून जवळच्या ‘आपले सेवा केंद्रा’वर जाऊन तात्काळ आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्जखात्यात जमा होणार आहे. मयत, वयस्कर तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ च्या स्वतंत्र कार्यपद्धतीनुसार (SOP) विशेष तरतूद केली असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *