डोणगावात हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस आणि स्व. आखाडेस्मृती सोहळा संपन्न

wartaa.in
Share on

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फखरुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. या खास प्रसंगी केवळ वाढदिवसाचा आनंद साजरा केला गेला नाही, तर संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय विजयभाऊ आखाडे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक पातळीवरील शिक्षण प्रसाराचे काम आणि सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फखरुद्दीन अली अहमद उर्दू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी आखाडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे आणि जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस कु. माधुरी देवानंद पवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय विजयभाऊ आखाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि त्यांना आदरांजली वाहून झाली. त्यानंतर उपस्थित वक्तांनी स्व. विजुभाऊंच्या कार्याचे स्मरण केले. संस्थेच्या उभारणीत त्यांनी घेतलेले परिश्रम आणि ग्रामीण भागातील शिक्षण प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान यावर वक्तांनी प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतात संस्थेची स्थापना करताना आलेल्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढत उभी राहिलेली ही संस्था याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या शिक्षण संस्थेची एक महत्त्वाची विशेषता म्हणजे येथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींचे प्रमाण मोठे आहे. ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, यासाठी ही संस्था महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. आजवर या शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थिनींनी उच्च पदांवर कार्य केले असून संस्थेच्या या यशस्वी प्रवाफाचे प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. लक्ष्मण दादा घुमरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या संघर्षाचा प्रवास मांडतानाच पै. बाबाभाई शहा, पै. गफार भाई आणि अजितभाई कुरेशी यांच्यासह अनेकांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवानंद पवार फाऊंडेशनच्या वतीने या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कु. माधुरी देवानंद पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम राबविणे हाच खरा जनसंपर्क असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्यांसह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक पातळीवर शिक्षण क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या मनोगतानंतर आणि राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *