सेवा संकल्प अभियानांतर्गत मन परिवर्तन व ध्यान सत्र संपन्न !
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.
सेवा संकल्प अभियानांतर्गत मन परिवर्तन व ध्यान सत्र संपन्न
माइंड कोच संजू वलथरे सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अर्जुनी मोरगाव, दि. ११ ऑक्टोबर २०२६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, अर्जुनी मोरगाव येथे रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता ‘Mind Transformation and Meditation Session’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात माइंड कोच संजू वलथरे सर यांनी विद्यार्थ्यांना मन परिवर्तन, ध्यानधारणा, सकारात्मक विचारसरणी, मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि एकाग्रता या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी मनावर नियंत्रण ठेवणे, नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये एकाग्रता, नियमित अभ्यास आणि मानसिक स्थैर्य यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. ध्यानधारणेच्या नियमित सरावामुळे मन शांत ठेवण्यास, तणावाचे व्यवस्थापन करण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात निश्चित ध्येय ठेवून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन संजू वलथरे सर यांनी केले.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबतच मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सकारात्मक विचारसरणीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेले हे सत्र विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाला वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती साधना यावलकर, कनिष्ठ लिपिक श्रीमती योगिता उके, बाह्यस्रोत कर्मचारी तसेच वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, मानसिक सक्षमीकरण आणि सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.

