गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा!
वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया
गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा!
भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा जयघोष; विविध ठिकाणी धम्मवंदना, बुद्धविचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश
गोंदिया जिल्ह्यात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये, शहरांमध्ये तसेच बौद्ध विहारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून नागरिकांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव साजरा केला.
या पवित्र दिनानिमित्त अनेक ठिकाणी बुद्धवंदना, त्रिशरण-पंचशील ग्रहण, धम्मदेसना तसेच सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांच्या करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि समतेच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. बौद्ध अनुयायी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेने देशात सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवमुक्तीच्या विचारांना नवी दिशा दिली. त्याच ऐतिहासिक परिवर्तनाची आठवण म्हणून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश तसेच तथागत गौतम बुद्धांचा शांती, अहिंसा आणि बंधुभावाचा विचार आत्मसात करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजातील भेदभाव दूर करून शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून प्रगत समाजनिर्मिती करण्याचा संकल्पही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यातील विविध भागांत धम्ममय वातावरण निर्माण झाले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागरिकांनी महामानवांच्या विचारांना अभिवादन करत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या जपणुकीचा संदेश दिला.

