इटियाडोहच्या पाण्याने ५ हजार ५० हेक्टर शेती फुलणार!

इटियाडोहच्या पाण्याने ५ हजार ५० हेक्टर शेती फुलणार!
Share on

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.

इटियाडोहच्या पाण्याने ५ हजार ५० हेक्टर शेती फुलणार!

पाणी वापर संस्थेचे नियोजन; गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अर्जुनी-मोरगाव : राज्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत इटियाडोह जलाशयातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यांतील सुमारे ५ हजार ५० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इटियाडोह जलाशयाच्या पाणीसाठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. यंदा पावसाचे प्रमाण आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जलाशयातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाणी वापर संस्थेची बैठक गुरुवारी (दि. २८) स्थानिक कार्यालयात पार पडली. या बैठकीत पाणीटंचाईसाठी आवश्यक पाणीसाठा आरक्षित ठेवून उर्वरित पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले.

जलाशयात सध्या १०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, आवश्यक आरक्षण वजा जाता उन्हाळी भात पिकासाठी ३.७४ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे आमगाव व देवरी तालुक्यातील सुमारे २ हजार २० हेक्टर, तर लाखांदूर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३ हजार ३० हेक्टर क्षेत्रातील भात पिकांना पाणीपुरवठा होणार आहे. अशा प्रकारे एकूण ५ हजार ५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

इटियाडोह जलाशयाच्या सिंचन क्षेत्रात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शेतजमिनींचा समावेश आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर केल्यास शेतकऱ्यांना उन्हाळी भात पिकासाठी मोठा आधार मिळणार आहे.

पाणी वापर संस्थेच्या या नियोजनामुळे तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळून सिंचन व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत इटियाडोह जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *