यांच्या लेखनाचे भरभरून कौतुक; विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये प्रयोगाची घोषणा
मुंबई : युगंधर क्रिएशन्स एलएलपी प्रस्तुत ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त रंगभूमीवर साकारण्यात आले आहे. सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवी हक्कांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या नाटकाचा प्रथम प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक प्रयोगाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
. राहुल नार्वेकर यांनी नाटकाचे लेखक माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या लेखनाचे आणि सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, “आज मला कळले की बडोले साहेब केवळ राजकारणी नाहीत, तर ते एक संवेदनशील नाटककारही आहेत. इतिहासातील संघर्षाला वर्तमानाशी जोडत त्यांनी समतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे रंगमंचावर साकारला आहे.”
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा उल्लेख करत राहुल नार्वेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याच्या अधिकारासाठीचा संघर्ष नव्हता, तर तो आत्मसन्मान, समानता आणि सामाजिक न्यायासाठीचा ऐतिहासिक लढा होता. त्या संघर्षाने भारतीय समाजाला नवी दिशा दिली. ‘पाण्याने पेटला वणवा’ हे नाटक त्या ऐतिहासिक लढ्याचा जाज्वल्य वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहे.”
यावेळी त्यांनी राजकुमार बडोले यांना उद्देशून भावनिक शब्दांत म्हटले,
“बडोले साहेब, तुमच्या विचारांनी आणि धाडसी पुढाकारामुळे समतेचा हा संदेश इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. आज रंगमंचावरून पेटलेली ही ज्योत पुढील हजार वर्षे पिढ्यान्पिढ्या समाजाला समानता, स्वाभिमान आणि न्यायाचा मार्ग दाखवत राहील. अशा कार्याची नोंद काळाच्या पानांवर कायम राहते”
या भाषणाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याच वेळी राहुल नार्वेकर यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचा विशेष प्रयोग विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात येईल. या प्रयोगासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि शासनाचे पूर्ण पाठबळ देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असे आश्वासन त्यांनी दिले. या घोषणेमुळे उपस्थित कलावंत, साहित्यिक आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचे लेखन माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विधानपरिषद आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी केले असून, दिग्दर्शन प्रशांत निगडे यांचे आहे. या नाटकाची निर्माती शारदा राजकुमार बडोले, सहनिर्माते गणेश कू. मोडक, तर निर्मिती प्रमुख समीर सूर्ये आहेत. संशोधन व सल्लागार म्हणून डॉ. संदीप वाघ, सूत्रधार म्हणून संतोष महाडिक यांनी योगदान दिले आहे.
नाटकाचे नेपथ्य सुनील पांचाळ आणि त्यांच्या टीमने, संगीत मिनार देशपांडे, प्रकाशयोजना सुनील मेळी, वेशभूषा सुप्रिया वाघ, रंगभूषा मिलिंद कोरटेकर, ध्वनी संयोजन पार्थ पवणे, लेखन सहाय्य योगेश माळकंडे, तर रंगमंच व्यवस्थापन अनिश काकडे, निरंजन जोशी आणि आनंद कोंकेर यांनी सांभाळले आहे.
नाटकातील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयातून महाडच्या सत्याग्रहाचा इतिहास रंगमंचावर अक्षरशः जिवंत केला. अविकार रांजणे, मधुरेश महाराजे, मधुशी निकम, मयुरेश मदवी, प्राजक्त पवड, रूपाली बिल्डीकर, अनिक जाधव, अर्जुन हर्डुकर, महेंद्र जाधव, साक्षी डोळे, संजना घाडसे, प्रेम जंगलीकर आणि गुणराज किरकेबवार यांनी आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारत सामाजिक समतेचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. प्रत्येक कलाकाराचा नैसर्गिक अभिनय, संवादफेक आणि रंगमंचावरील सहज वावर यामुळे इतिहासातील घटना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभी राहिल्याचा अनुभव प्रेक्षकांना आला.
नाटकाचे प्रभावी नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि आशयपूर्ण संवाद यांनी संपूर्ण प्रयोग अधिक परिणामकारक केला. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहातील संघर्ष, त्याग आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा अत्यंत प्रभावी पद्धतीने साकारण्यात आली. त्यामुळे हे नाटक केवळ ऐतिहासिक घटनांची पुनरावृत्ती न करता, आजच्या समाजालाही संविधानिक मूल्ये, समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे.
प्रथम प्रयोगानंतर मिळालेली मान्यवरांची उत्स्फूर्त दाद आणि विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये विशेष प्रयोग आयोजित करण्याची घोषणा ही ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे नाटक करत असून, मराठी रंगभूमीवरील सामाजिक आशयाची एक प्रभावी कलाकृती म्हणून त्याची नोंद निश्चितच घेतली जाईल.

