IIS मध्ये निवड! बोंडगाव देवीचा नितीन फुल्लुके ठरला विदर्भाचा अभिमान!

wartaa.in
Share on

आमदार राजकुमार बडोले यांनी निवासस्थानी जाऊन पालकांचा सत्कार केला

बोंडगाव देवी, ता. अर्जुनी मोरगाव –
भारतीय माहिती सेवा (Indian Information Service – IIS) या केंद्रीय सेवेमधील एक प्रतिष्ठित पद असून देशातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही सेवा एक स्वप्नवत संधी मानली जाते. या पदासाठी बोंडगाव देवी येथील सुपुत्र नितीन अभय फुल्लुके यांची यशस्वी निवड झाल्याने संपूर्ण अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचा अभिमान वाढला आहे.

या उल्लेखनीय यशाच्या निमित्ताने माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी स्वत: फुल्लुके कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व अभिनंदन केले.

भारतीय माहिती सेवा (IIS) ही संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे मिळणारी एक महत्त्वाची पदवी आहे. या सेवेतील अधिकाऱ्यांना भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विशेषतः माहिती व प्रसारण मंत्रालयात कार्य करण्याची संधी मिळते. नितीन फुल्लुके यांचे हे यश त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मेहनत, व कुटुंबाचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा परिपाक मानले जात आहे.

राजकुमार बडोले यांनी या भेटीत सांगितले की, “नितीनसारख्या युवकांच्या यशामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण होतो.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य दिशादर्शन, मार्गदर्शन व परिश्रम यांच्या बळावर हे विद्यार्थी देशाच्या प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवत आहेत, ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायक आहे.”

नितीनच्या यशामुळे बोंडगाव देवी व परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, गावकरी व नातेवाईक यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यांच्या या प्रवासाने निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठेवलाय.

राजकुमार बडोले यांनी फुल्लुके कुटुंबीयांना प्रशासकीय सेवा क्षेत्रात मुलाच्या पदार्पणाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पाठिंबा जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *