वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची मालिका; आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावर भर
आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवस
आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामागे मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा, युवकांना रोजगाराभिमुख दिशा आणि पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्रीराम विद्यालय, चिचगड येथे वाचनालय लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृतीची गोडी लागावी आणि ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
त्याच दिवशी, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, बोरगांव येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. डॉक्टरांच्या तज्ञ पथकाद्वारे मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.
यानंतर, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता बीजेपर, सालेकसा येथे पोलीस भरतीपूर्व मॅरॅथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि स्पर्धेची तयारी वाढावी, यासाठी खास उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
तसेच, भवभूती महाविद्यालय, आमगांव येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून युवकांचा सहभाग अपेक्षित आहे.
शेवटी, सायंकाळी ४ वाजता किंडंगीपार येथे वृक्षारोपण सोहळा होणार असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वांनी एक वृक्ष लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
या संपूर्ण उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे – जनतेच्या आरोग्याची काळजी, युवकांच्या भविष्यासाठी दिशा आणि पर्यावरण रक्षण. या सगळ्या योजनांद्वारे आमदार संजय पुराम यांनी समाजाशी थेट संपर्क प्रस्थापित करत जनतेच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
ते आपल्या संदेशात म्हणतात, “या उपक्रमांमध्ये युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या सहभागामुळेच या उपक्रमांना यश लाभेल आणि समाजहिताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकता येईल.”

