पवनी वनविभागाच्या जागेत अवैध उत्खनन वनविभागाने जेसीबीसह टिप्पर घेतले ताब्यात

wartaa.in
Share on

पवनी वनपरिक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खननाचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, भंडारा जिल्ह्यातील संरक्षित वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे अवैध खोदकाम सुरू असल्याचे वनविभागाच्या गस्ती दरम्यान निदर्शनास आले आहे. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभागाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र सावरला अंतर्गत गुडेगाव बिटात, दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास, क्षेत्रसहाय्यक आय.एच. काटेखाये व बिटरक्षक गुडेगाव बिटाचे जी.एन. नागरगोजे हे नियमित गस्तीवर असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

गस्ती दरम्यान नियतक्षेत्र गुडेगाव अंतर्गत मौजा गुडेगाव, कक्ष क्रमांक 238 या संरक्षित वनक्षेत्रात, पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने गौण खनिज (मुरुम) अवैधपणे खोदून ट्रकद्वारे वाहतूक केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. संरक्षित जंगलात अशा प्रकारे जड यंत्रसामग्रीचा वापर करून उत्खनन केल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बाब तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आली. योगेन्द्र सिंह, उपवनसंरक्षक, भंडारा तसेच सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव), भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी, श्रीमती व्हि. के. नागदेवे यांनी घटनास्थळी तातडीने धडक कारवाई केली.

कारवाईदरम्यान एक पोकलॅन्ड मशीन व तीन टिप्पर (ट्रक) असा मोठा मुद्देमाल घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी प्रसुरी क्रमांक 03827/01/2026 दिनांक 06/01/2026 नुसार भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 33(1) व 52 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून वाहने अधिकृतरीत्या जप्त करण्यात आली आहेत.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी, श्रीमती व्हि. के. नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अवैध उत्खननामागे नेमके कोणते लोक सहभागी आहेत, याचा सखोल तपास केला जात आहे. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी वनविभागाकडून अधिक कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलालगत अवैध खोदकाम, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड व अवैध शिकार यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी विभाग यांनी नागरिकांना आवाहन केले असून, अशा कोणत्याही बेकायदेशीर कृतीची माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकच्या वनअधिकारी किंवा वनकर्मचाऱ्यांना कळवावे, अथवा फॉरेस्ट हेल्पलाईन क्रमांक 1926 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वनसंपत्तीचे संरक्षण ही केवळ वनविभागाचीच नव्हे तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा अवैध कृत्यांना आळा घालणे शक्य होईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *