उद्योजकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करुन निर्यातीवर भर द्यावा : जिल्हाधिकारी प्रजित नायर
उद्योजकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करुन निर्यातीवर भर द्यावा, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी गोंदिया येथे केले. जिल्ह्यातील तांदूळ उत्पादनाबरोबरच इतर वनोत्पादने, मत्स्य उत्पादने आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये प्रचंड निर्यात क्षमता असून, या संधीचा लाभ घेतल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने “महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन 2026” या एकदिवसीय निर्यात कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी प्रजित नायर बोलत होते.
जिल्हाधिकारी नायर पुढे म्हणाले की, स्थानिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळाले, तर त्याचा थेट फायदा स्थानिक उद्योजक, शेतकरी, कामगार आणि तरुणांना होईल. निर्यात वाढल्यामुळे जिल्ह्याच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात (GDP) वाढ होऊन आर्थिक व सामाजिक प्रगतीला गती मिळेल. जिल्हा प्रशासन उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून, उद्योजकांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा प्रशासनासमोर नियमितपणे मांडाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विक्की खिराळे, नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक शिवकुमार मुद्दमवार, डीजीएफटीचे कार्यकारी अधिकारी श्री. सोनवाणे, मैत्री कक्षाच्या प्रियदर्शिनी सोनार, पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक श्री. हिवराळे, IDBI Capital चे सहाय्यक व्यवस्थापक उमेश रानोलिया, NIACL चे अधिकारी पियुष धोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अण्णा ठाकरे, महा STRIDE उपक्रमाचे विभागीय समन्वयक रंजन पंधरे यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक शिवकुमार मुद्दमवार यांनी केले. त्यांनी ‘महा निर्यात’ उपक्रमामागील शासनाची भूमिका स्पष्ट करत जिल्हास्तरावर निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन निर्यात क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाव्यवस्थापक विक्की खिराळे यांनी महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023, ODOP (One District One Product) आणि GI टॅग प्राप्त उत्पादनांबाबत शासनाच्या धोरणांची सविस्तर माहिती दिली. केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार सन 2024-25 मध्ये गोंदिया जिल्ह्यातून तब्बल 2161 कोटी रुपयांची निर्यात झाली असून, नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातून प्रामुख्याने तांदूळ आणि लाख यांची निर्यात केली जाते.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, औद्योगिक संस्था, एफपीओ, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) निर्यात प्रक्रियेबाबत सखोल व व्यावहारिक मार्गदर्शन देणे हा होता. यामध्ये निर्यात नोंदणी प्रक्रिया, परदेशी बाजारपेठांतील संधी, शासकीय अनुदाने, वित्तपुरवठा योजना, कृषी व प्रक्रिया उद्योगांसाठी निर्यात धोरणे तसेच जिल्हा निर्यात हब संकल्पना या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले यांनी उपस्थितांचे आभार मानत, जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

