उपवर्गीकरणाच्या मोर्चावरून मातंग नेत्यांमध्ये दुफळी, भाजप आमदार विरुद्ध इतर नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
वार्ताहर : Super Admin | विदर्भ
उपवर्गीकरणाच्या शक्तिप्रदर्शनानंतर मातंग नेत्यांमध्ये संघर्ष
अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत नुकतेच मोठे जाहीर शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र, या मोर्चानंतर मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांमध्ये उघड दुफळी निर्माण झाली असून आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. या वादाला आता थेट भाजप आमदार विरुद्ध इतर मातंग नेते असे स्वरूप आले आहे. मोर्चासाठी जमा करण्यात आलेला निधी आणि महायुती सरकारच्या सोयीने शांततेत करण्यात आलेली मोर्चाची सांगता, या दोन मुख्य मुद्द्यांवरून हा वाद निर्माण झाला आहे.
भाजप आमदारांचा पुढाकार आणि जाहिरातबाजी
मुंबईतील या मोर्चाच्या अग्रभागी सुनील कांबळे, जितेश अंतापूरकर आणि अमित गोरखे हे तिन्ही भाजप आमदार सक्रिय होते. या मोर्चाच्या प्रचारासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठे होर्डिंग्ज तसेच दूरचित्रवाहिन्यांवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र सत्ताधाऱ्यांच्या सहभागामुळे आंदोलनाच्या स्वरूपावर अन्य नेत्यांकडून आक्षेप नोंदवले जात आहेत.
निधी दडवल्याचा आणि तडजोडीचा आरोप
माजी आमदार आणि लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांनी मोर्चाच्या संयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. संयोजकांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दडवल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष, स्थानिक आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला थेट मदत मिळाली होती, असा दावा त्यांनी केला. तसेच, शिष्टमंडळाने उपवर्गीकरणाची हमी घेताना तडजोड केली असून समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. कदम यांनी दावा केला की, ७२ मोर्चे काढतेवेळी या नेत्यांनी १५ कोटींचा निधी जमवला होता आणि सामाजिक न्याय विभाग तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून या नेत्यांना कंत्राटे देण्यात आली आहेत.
समन्वयकांचे परस्परविरोधी प्रत्यारोप
सकल मातंग राज्य समन्वयक मारोती वाडेकर यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. त्यांनी म्हटले, "मातंग समाजाचे मुंबईतले आंदोलन हे भाजपचे अधिवेशन होते. भाजप आमदार अमित गोरखे याला कारणीभूत आहेत. सरकारच्या सोयीने मोर्चाच्या मागण्या केल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे."
दुसरीकडे, सकल मातंग राज्य समन्वयक ॲड. राम चव्हाण यांनी रमेश कदम यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर प्रत्यारोप केले आहेत. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, "माजी आमदार रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातील समाजाच्या पैशाचा अपहार केला होता. त्यामुळे समाजाने कदमांना दूर केले असून ते सध्या नैराश्यात आहेत."
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात आला असतानाच मातंग समाजातील अंतर्गत नेत्यांमधील हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

