महाराष्ट्राचे ऊर्जा दालन ठरतेय आकर्षणाचे केंद्र; भारत रिन्यूएबल एनर्जी समिटमध्ये हरित ऊर्जेच्या प्रकल्पांची व्हर्च्युअल सफर
स्थान: नवी दिल्ली
नवी दिल्ली, दि. ५ नोव्हेंबर : ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा आणि आधुनिक हरित ऊर्जा तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनातून अनुभवायला मिळत आहे. भारत रिन्यूएबल एनर्जी समिट–२०२६ मध्ये महाराष्ट्राने साकारलेल्या या दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील ऊर्जा योजनांनी लक्ष वेधले आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्राला ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
### नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरे स्थान मिळविल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या ऊर्जा दालनातून सादर करण्यात आलेल्या योजनांना आणि प्रकल्पांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांनी एकत्रितपणे हे दालन उभारले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली दालनाची उभारणी करण्यात आली आहे.
### व्हर्च्युअल रिअॅलिटीमधून ऊर्जा प्रकल्पांची सफर
दालनातील इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन हे अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांची आभासी सफर अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची माहिती प्रत्यक्ष अनुभवाच्या स्वरूपात मांडल्यामुळे अभ्यागतांना योजनांचे स्वरूप आणि त्यामागील तंत्रज्ञान समजून घेणे सोपे होत आहे.
### डिजिटल तंत्रज्ञानातून योजनांची माहिती
दृकश्राव्य सादरीकरणे आणि संवादात्मक डिजिटल माध्यमांचा वापर करून चारही वीज कंपन्यांची कामगिरी, प्रमुख योजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक बाबी सर्वसामान्य अभ्यागतांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीवर आधारित दालनाची रचना हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. राज्याच्या गडकिल्ल्यांचा वारसा आणि हरित ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल यांची सांगड घालण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत माहितीची सुटसुटीत मांडणी केल्यामुळे दालनाला अभ्यागतांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दालनातील सेल्फी बूथही उपस्थितांचे आकर्षण ठरत आहे.
### हरित ऊर्जेच्या भविष्याचा वेध
नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार हा केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित नसून शेती, उद्योग आणि नागरिकांच्या ऊर्जा गरजांशीही संबंधित आहे. सौर ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प आणि ऊर्जा वितरणातील आधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी वापर भविष्यातील ऊर्जा व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत रिन्यूएबल एनर्जी समिटमधील महाराष्ट्राचे दालन राज्याच्या या प्रयत्नांचे दर्शन घडवत आहे. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत महाराष्ट्राने आपल्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय व्यासपीठावर मांडले आहेत.

