क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात वाचन प्रेरणा दिन साजरा !
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात वाचन प्रेरणा दिन साजरा
अर्जुनी मोरगाव : सेवा संकल्प अभियानांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, अर्जुनी मोरगाव येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती सुनीता हुमे मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम करून मोठी स्वप्ने पाहावीत, ज्ञानाच्या बळावर समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच वाचनाची सवय व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असून, प्रत्येक विद्यार्थिनीने दररोज किमान दहा पाने वाचण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी आपल्या आवडीची पुस्तके वाचून वाचन प्रेरणा दिन साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची वृद्धी करणे आणि स्व-अध्ययनाची सवय विकसित करण्याचा संदेश देण्यात आला.
ज्ञान, वाचन आणि परिश्रम यांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून विद्यार्थिनींनी केला.

