अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करा – आमदार राजकुमार बडोले यांची मागणी :
वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करा – आमदार राजकुमार बडोले यांची मागणी
रोहयो मंत्री भरत गोगावले यांची मंत्रालयात भेट
मोठ्या प्रमाणात अकुशल कामे सुरू करण्याचे आश्वासन
सडक अर्जुनी
यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे तसेच पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर आर्थिक संकटात सापडले असून, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगाव या तीनही तालुक्यांमध्ये जी रामजी रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच अकुशल कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार राजकुमार बडोले यांनी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत गोगावले यांची त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान आणि शेतमजुरांसमोर निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न याबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच तिन्ही तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.
यावर्षी पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने अनेक भागांतील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण कुटुंबांना सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावागावांत कामे उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळून आर्थिक दिलासा मिळू शकतो, अशी भूमिका आमदार बडोले यांनी मांडली.
आमदार बडोले यांच्या निवेदनाची दखल घेत रोहयो मंत्री ना. भरत गोगावले यांनी यावर्षी रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अकुशल कामे हाती घेण्यात येतील, तसेच निधीची कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले.
मंत्र्यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगाव या तीनही तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगार कुटुंबांना आगामी काळात रोजगाराची संधी मिळून आर्थिक संकटातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

