आमदार राजकुमार बडोले लिखित ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचा प्रयोग सोलापूरच्या प्रेक्षकांसमोर सादर झाला. टाळ्या, हुंकार आणि अनेक डोळ्यात पाणी !.
वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र
सोलापुरात रंगला 'पाण्याने पेटला वणवा' नाटकाचा प्रयोग
सोलापूर: आमदार राजकुमार बडोले लिखित 'पाण्याने पेटला वणवा' या नाटकाचा प्रयोग सोलापूरच्या प्रेक्षकांसमोर नुकताच सादर करण्यात आला. या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांनी टाळ्या, हुंकार आणि डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंसह नाटकाला उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद दिला.
महाडच्या ऐतिहासिक लढ्याचा जागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर झालेला सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यापुरता मर्यादित लढा नव्हता; तर तो मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सामाजिक समतेसाठी उठवलेला बुलंद आवाज होता. हाच ऐतिहासिक आणि सामाजिक संघर्षाचा पट 'पाण्याने पेटला वणवा' या नाटकातून रंगमंचावर जिवंत करण्यात आला आहे.
नव्या पिढीला इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती
बाबासाहेबांच्या संघर्षाशी जोडलेली ओळख अधोरेखित करणाऱ्या या नाटकाने सोलापुरातील प्रेक्षकांची मने जिंकली. महाडच्या लढ्याचा इतिहास नव्या पिढीला केवळ पुस्तकांमधून वाचण्याऐवजी रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून थेट अनुभवातून समजून घेण्याची संधी या नाटकामुळे मिळत असल्याचे दिसून आले. कलाकारांचा अभिनय आणि नाटकाच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

