अहेरीचे नगरसेवक गोंदिया एसीबीच्या जाळ्यात.!

अहेरीचे नगरसेवक गोंदिया एसीबीच्या जाळ्यात.!
Share on

वार्ताहर : अजय शहारे | अहेरी/गोंदिया

अहेरीचे नगरसेवक गोंदिया एसीबीच्या जाळ्यात.
१.२० लाखांची लाच स्वीकारताना अमोल गुडेलीवार रंगेहात गजाआड
अहेरी / गोंदिया : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी १ लाख २० हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), गोंदियाच्या पथकाने आज, १५ ऑक्टोबर रोजी रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे अहेरी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदार (वय ३३ वर्षे) हे नोंदणीकृत इलेक्ट्रिकल ठेकेदार असून त्यांचे अहेरी येथे विजेचे दुकान आहे. नगरोत्थान योजना २०२५-२६ अंतर्गत अहेरी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. १ ते १० आणि प्रभाग क्र. ११ ते १७ मध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याचे एकूण १९ लाख ८७ हजार ७६५ रुपयांचे काम तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याने विहित मुदतीत पूर्ण केले होते.

सदर कामाचे संपूर्ण बिल मंजूर झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेलीवार तक्रारदाराच्या दुकानात गेले. ‘सदर कामे जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली येथून मी स्वतःच्या कोट्यातून मंजूर करून आणली आहेत; त्यामुळे एकूण बिलाच्या १५ टक्के प्रमाणे ३ लाख रुपये लाच द्यावी लागेल,’ अशी मागणी त्यांनी लावून धरली. तक्रारदाराने नाईलाजास्तव ५ ऑगस्ट २०२६ रोजी ३० हजार रुपये दिले होते.

मात्र, उर्वरित २ लाख ७० हजार रुपयांसाठी गुडेलीवार व्हॉट्सॲप कॉलवरून वारंवार तगादा लावत असल्याने तक्रारदाराने अखेर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे एसीबी पथकाने १५ ऑक्टोबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, गुडेलीवार यांनी २ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती तक्रारदाराने सध्यातरी १ लाख २० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आरोपीने ही रक्कम स्वतःच्या हार्डवेअर दुकानात आणून देण्यास सांगितले.

लाचेची रक्कम १ लाख २० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने अमोल गुडेलीवार यांना रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, एएसआय चंद्रकांत करपे, हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, नाईक संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे व दीपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *