जुहूत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांचा गोळीबार टायगर बालंबाल बचावला, दोन जखमी.
वार्ताहर : अजय शहारे | मुंबई
जुहूत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांचा गोळीबार
टायगर बालंबाल बचावला, दोन जखमी.
घटनेची शासनाकडून गंभीर दखल; मुख्यमंत्र्यांचे तपासाचे आदेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर रविवारी संध्याकाळी जुहू परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. टायगर श्रॉफ जुहू येथील मैदानात फुटबॉलचा सराव आणि खाजगी कार्यक्रम संपवून आपल्या कारने बाहेर पडत असताना संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या आणि तिथून पोबारा केला. या थरारक हल्ल्यात टायगर श्रॉफ सुदैवाने बालंबाल बचावला असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, या गोळीबारात त्याचा कारचालक फिरदौस आणि चौहान नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबईसह चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याविषयी प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP) मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले की, संध्याकाळी सुमारे ७:०० वाजता टायगर श्रॉफ एका खाजगी कार्यक्रमानंतर परतत असताना अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये टायगर श्रॉफ यांना कोणतीही गोळी लागलेली नसून ते सुरक्षित आहेत. त्यांचे चालक फिरदौस यांच्या हाताला दुखापत झाली असून ते सध्या धोक्याबाहेर आहेत, तर जखमी चौहान यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी विविध पथके तयार केली असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची प्राथमिक तपासणी पूर्ण केली आहे.
दरम्यान, घटनेचे वृत्त समोर येताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. मुंबईत ९० च्या दशकाप्रमाणे गँगवॉर किंवा गुंडगिरी पुन्हा डोके वर काढू दिली जाणार नाही, सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असून हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून घटनेचा आढावा घेतला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

