ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी ‘पीएम यशस्वी’ शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू ..

ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी ‘पीएम यशस्वी’ शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू ..
Share on

वार्ताहर : अजय शहारे | गोदिया

ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी ‘पीएम यशस्वी’ शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू
३० ऑक्टोबरपर्यंत मुदत; मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर योजनांसाठी 'एनएसपी' आणि 'महाडीबीटी'वर अर्ज करण्याचे आवाहन.

गोंदिया : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (EBC) आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पीएम यशस्वी’ (PM YASASVI) मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरून घेण्याची खबरदारी संबंधित शाळा व कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक तुषार गुरव यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘पीएम यशस्वी’ योजनांची अंमलबजावणी निर्धारित सूचनांनुसार थेट राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना संबंधित योजनेसाठी निश्चित केलेल्या अधिकृत पोर्टलची खातरजमा करूनच अर्ज सादर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे स्वरूप
‘पीएम यशस्वी प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप’ अंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र मुला-मुलींनी आपले अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) सादर करावयाचे आहेत.

मात्र, इयत्ता नववी व दहावीतील ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचे अर्ज ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर भरले जातील. याव्यतिरिक्त इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती अर्ज पूर्वीप्रमाणेच महाडीबीटी पोर्टलवर भरावे लागणार आहेत.

माध्यमिक शाळांमधील VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी असलेली जिल्हा परिषद गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुंबईपुरती मर्यादित गुणवंत शिष्यवृत्ती, दारिद्र्यरेषेखालील (BPL) विद्यार्थ्यांसाठी खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती आणि सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा देखभाल भत्ता या सर्व योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरच स्वीकारले जातील.

मॅट्रिकोत्तर नवीन अर्ज थेट ‘NSP’ पोर्टलवर
‘पीएम यशस्वी पोस्ट-मॅट्रिक स्कॉलरशिप’ अंतर्गत इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन (Fresh) अर्ज आता केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरच (NSP) भरावे लागतील.

यामध्ये ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्तीचा समावेश आहे. या चारही प्रमुख योजनांसाठी यंदा महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणीची सुविधा बंद ठेवण्यात आली असून, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तात्काळ एनएसपी पोर्टलवर अर्ज भरण्याचे निर्देश द्यावेत, असे सांगण्यात आले आहे.

महाडीबीटीवर सुरू असणाऱ्या सात प्रमुख योजना.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खालील सात योजनांचे अर्ज पूर्वीप्रमाणेच महाडीबीटी पोर्टलवर भरता येतील :

१. राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इयत्ता ११ वी व १२ वीच्या VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी).

२. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि संलग्न वसतिगृहात राहणाऱ्या VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता.

३. इमाव, विमाप व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.

४. इतर मागासवर्ग (OBC) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती.

५. विशेष मागास प्रवर्ग (SBC) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती.

६. विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती.

७. OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तंत्र व व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.

विलंब झाल्यास शाळा-महाविद्यालये जबाबदार!

“शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कोणताही पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास अथवा दिरंगाई झाल्यास संबंधित शाळा व महाविद्यालय प्रशासन थेट जबाबदार राहील. सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांनी पात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के नोंदणी ३० ऑक्टोबर २०२६ पूर्वी वेळेत पूर्ण करून घ्यावी.”

तुषार गुरव, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, गोंदिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *