साकोली तालुक्यात विजेचा तीव्र धक्का बसून तरुणाचा जागीच मृत्यू

Share on

वार्ताहर : Super Admin | विदर्भ

विजेच्या खांबावर चढताना घडली दुर्घटना

साकोली: इलेक्ट्रिक खांबावरील नट-बोल्ट चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना विजेचा जोरदार शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बोरगाव परिसरातील एका शेतात घडली असून या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मृतक तरुणाचे नाव विष्णू आनंदराव कोहळे (वय ३३ वर्षे, रा. बाम्हणीवाडा, तालुका साकोली) असे आहे. बोरगाव स्मशानभूमीजवळ खुशाल तरोणे यांचे शेत आहे. या शेतातील इलेक्ट्रिक पोलच्या सपोर्ट तारा कापून विष्णू खांबावर चढला होता. तो खांबावरील नट-बोल्ट खोलण्याचा प्रयत्न करत होता.

विजेचा तीव्र शॉक लागून जमिनीवर कोसळला

नट-बोल्ट काढत असताना त्याच्या डोक्याला मुख्य विद्युत लाईनच्या तारेचा स्पर्श झाला. विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसल्याने तो थेट खाली जमिनीवर पडला. पोलखाली पाणी आणि चिखल साचलेला होता. गंभीररीत्या भाजल्याने आणि विजेच्या धक्क्यामुळे तडफडून त्याचा तिथेच अंत झाला.

साकोली पोलिसांत मर्ग नोंद

घटनास्थळी तरुणाचा मृतदेह चिखलमातीने पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दखल घेतली असून साकोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *