गणेशपूरमध्ये लाखो रुपयांची सौर ऊर्जा पाणीयंत्रणा धूळखात
स्थान: Bhandara
तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील पवनारखारी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल गणेशपूर गावात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सौरऊर्जा आधारित पाणीटंकी आणि पाणीपुरवठा यंत्रणा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद आणि धूळखात पडली आहे. या गंभीर समस्येमुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत व भटकंती करावी लागत असून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासकीय निधीचा योग्य वापर आणि वेळेवर देखभाल-दुरुस्ती न झाल्यामुळे ही महत्त्वाची योजना सध्या बंद असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमका किती निधी खर्च करण्यात आला आणि कोणकोणत्या शासकीय योजनेतून हा निधी मंजूर झाला याची माहिती प्रशासनाने द्यावी. तसेच हे काम कोणत्या एजन्सीने केले आणि प्रत्यक्ष या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीची सध्या नेमकी जबाबदारी कोणाची आहे या सर्व प्रश्नांचा हिशोब प्रशासनाने ग्रामस्थांसमोर जाहीर करावा अशी आक्रमक मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. ग्रामीण भागात नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असताना स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सौर यंत्रणा बिघडल्यानंतर किंवा बंद पडल्यानंतर तिची वेळेत दुरुस्ती का करण्यात आली नाही आणि निधी उपलब्ध असूनही योजना बंद का पडली यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवर यामुळे तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरत आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांमध्ये या योजनेवर खर्च झालेल्या संपूर्ण निधीचा हिशोब ग्रामसभेत किंवा सार्वजनिकरीत्या जाहीर करावा हा मुख्य मुद्दा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेशपूर गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी आणि बंद असलेली ही पाणीपुरवठा यंत्रणा तातडीने पूर्ववत सुरू करावी जेणेकरून गावकऱ्यांची गैरसोय थांबेल. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची छाननी करावी आणि कुठेही निष्काळजीपणा आढळल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासकीय बाजू मांडताना पवनारखारी गट ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दिनेश सिंदराम यांनी स्पष्ट केले आहे की सौर ऊर्जेवर चालणारी पाणीपुरवठा योजना मागील काही काळापासून बंद नक्कीच आहे मात्र ग्रामस्थांच्या सोयीसाठी गावात पर्यायी कुपनलिकेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी गणेशपूर या आदिवासी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करत असून प्रशासनाने याकडे केवळ तात्पुरत्या उपायांवर न थांबता कायमस्वरूपी गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर सौर ऊर्जा योजना पूर्ववत चालू करावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून लावून धरण्यात आली आहे.

