आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; आमदार राजकुमार बडोले यांची मागणी
आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या आई-वडिलांची बडोले यांनी घेतली भेट, दोषींवर कडक कारवाईचा आग्रह
मुंबई :
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या साहिलच्या आई-वडिलांची भेट घेऊन बडोले यांनी त्यांचे सांत्वन केले आणि या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
आझाद मैदानावर कुटुंबीयांचे उपोषण
आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संशयास्पद मृत्यूनंतर न्याय मिळावा यासाठी त्याचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली वाकोडे यांनी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
साहिलच्या कुटुंबीयांनी आयआयटी मुंबईतील संबंधित व्यक्तींवर अतिशय गंभीर आरोप केले असून या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार आहे, हे समोर येईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे.
आमदार राजकुमार बडोले यांनी घेतली भेट
माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी बुधवारी आझाद मैदानावर जाऊन उपोषणकर्ते रवींद्र वाकोडे आणि सोनाली वाकोडे यांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांची व्यथा ऐकून घेत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
या वेळी बोलताना आमदार बडोले यांनी स्पष्ट केले की, एका गुणवंत विद्यार्थ्याचा मृत्यू ही अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक बाब आहे. साहिलच्या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, जेणेकरून सत्य जनतेसमोर येईल.
पारदर्शक चौकशी व कारवाईची मागणी
साहिलच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांसह आमदार बडोले यांनी केली आहे. या घटनेत जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

