नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: सहा जिल्ह्यांतील १४ आमदार आणि दोन खासदार पदवीधर नसल्याने मतदानापासून वंचित

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: सहा जिल्ह्यांतील १४ आमदार आणि दोन खासदार पदवीधर नसल्याने मतदानापासून वंचित
Share on

वार्ताहर : Sahil Yerne | विदर्भ

नागपूर पदवीधर निवडणूक: लोकप्रतिनिधी प्रचारात आघाडीवर, पण मतदानास मुकणार

विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत सहा जिल्ह्यांतील पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असले, तरी याच सहा जिल्ह्यांचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांपैकी ४३ टक्क्यांहून अधिक आमदार पदवीधर नसल्याने मतदानाला मुकणार असल्याचे समोर आले आहे. ते स्वतः मतदानापासून वंचित राहणार असले, तरी प्रत्यक्ष प्रचारात मात्र सक्रिय आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात विधानसभेचे एकूण ३२ आमदार येतात. त्यापैकी तब्बल १४ आमदारांना पदवीधर नसल्याने मतदानाचा अधिकार मिळालेला नाही. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने येथे राजकीय पदापेक्षा शैक्षणिक पात्रतेला महत्त्व असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक पाच आमदार कक्षेबाहेर

नागपूर जिल्ह्यातून तब्बल पाच आमदार मतदानासाठी पात्र ठरलेले नाहीत:
* प्रवीण दटके (मध्य नागपूर, भाजप) – पदविका प्रथम वर्ष
* कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व, भाजप) – सातवी
* चंद्रशेखर बावनकुळे (कामठी, भाजप) – बीएस्सी प्रथम वर्ष
* चरणसिंह ठाकूर (काटोल, भाजप) – बारावी
* मोहन मते (नागपूर दक्षिण, भाजप) – आयटीआय

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार आमदार

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकूण सात विधानसभा आमदार आहेत, त्यातील चार आमदार पदवीधर नाहीत:
* नाना पटोले (साकोली, काँग्रेस) – बीए द्वितीय
* राजू कारेमोरे (तुमसर, राष्ट्रवादी अजित पवार गट) – बारावी
* विनोद अग्रवाल (गोंदिया, भाजप) – बारावी
* संजय पुराम (आमगाव, भाजप) – बारावी

चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतील स्थिती

इतर तीन जिल्ह्यांमधील प्रमुख लोकप्रतिनिधीही मतदानापासून दूर राहणार आहेत:
* विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी, चंद्रपूर, काँग्रेस) – दहावी
* किशोर जोरगेवार (चंद्रपूर, भाजप) – दहावी
* धर्मरावबाबा आत्राम (अहेरी, गडचिरोली, राष्ट्रवादी अजित पवार गट) – दहावी
* समीर कुणावार (हिंगणघाट, वर्धा, भाजप) – बारावी
* राजेश बकाने (देवळी, वर्धा, भाजप) – बीए प्रथम

दोन खासदारही मतदानापासून दूर

केवळ विधानसभेचे आमदारच नव्हे, तर या परिसरातील दोन खासदारांनाही या निवडणुकीत मतदानाचा हक्क नाही. यामध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे (बीए द्वितीय) आणि भाजपच्या राज्यसभा खासदार माया इवनाते (पाचवी) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *