पाण्याने पेटला वणवा : राहुल नार्वेकर यांचे राजकुमार बडोले यांच्या लेखनाचे भरभरून कौतुक; विधानभवनात प्रयोगाची घोषणा!

Share on

पाण्याने पेटला वणवा : राहुल नार्वेकर यांचे राजकुमार बडोले यांच्या लेखनाचे भरभरून कौतुक; विधानभवनात प्रयोगाची घोषणा!
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक मराठी नाटक ‘पाण्याने पेटला वणवा’ च्या प्रथम प्रयोगाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहावर आधारित या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांसह मान्यवरांनाही अंतर्मुख केले. नाटक संपल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी लेखक राजकुमार बडोले यांच्या लेखनाचे आणि सामाजिक भानाचे मनापासून कौतुक करत रंगमंचावरच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेली व्यक्ती इतक्या प्रभावी पद्धतीने ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर नाटक लिहू शकते, याचे आश्चर्य व्यक्त करत राहुल नार्वेकर म्हणाले की, “आज मला कळले की बडोले साहेब केवळ राजकारणी नाहीत, तर एक संवेदनशील लेखकही आहेत. त्यांनी इतिहासातील संघर्षाला वर्तमानाशी जोडत समतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे रंगमंचावर मांडला आहे.”
यावेळी त्यांनी राजकुमार बडोले यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत आपल्या भाषणात म्हटले,
“बडोले साहेब, तुमच्या विचारांनी आणि धाडसी पुढाकारामुळे समतेचा हा संदेश इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. आज रंगमंचावरून पेटलेली ही ज्योत पुढील १००० वर्षे पिढ्यान्पिढ्या समाजाला समानता, स्वाभिमान आणि न्यायाचा मार्ग दाखवत राहील. अशा कार्याची नोंद काळाच्या पानांवर कायम राहते. जय भीम!”
या शब्दांना उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. नाटकातील सामाजिक आशय, प्रभावी संवाद, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले होते.
राहुल नार्वेकर यांनी याच वेळी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाचा विशेष प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्याचा मानस आहे. या प्रयोगासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि पाठबळ देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो, असे आश्वासन त्यांनी दिले. या घोषणेमुळे उपस्थित कलावंत, साहित्यिक आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला प्रभावी कलात्मक रूप देते. सार्वजनिक पाण्याचा हक्क हा केवळ पाणी पिण्याचा प्रश्न नव्हता, तर तो मानवी स्वाभिमान, समानता आणि संविधानिक अधिकारांचा संघर्ष होता, हा संदेश नाटक अत्यंत प्रभावीपणे पोहोचवते.
या नाटकाचे लेखन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले असून दिग्दर्शन प्रशांत निगडे यांचे आहे. कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रत्येक प्रसंग वास्तव वाटतो आणि प्रेक्षकांना इतिहास प्रत्यक्ष अनुभवत असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे हे नाटक केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाही, तर सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून उभे राहते.
प्रथम प्रयोगानंतर मिळालेली मान्यवरांची उत्स्फूर्त दाद आणि विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये विशेष प्रयोग आयोजित करण्याची घोषणा ही या नाटकासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. सामाजिक परिवर्तनाचा संदेश कलामाध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाला आता राज्यभरातून अधिक व्यापक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘पाण्याने पेटला वणवा’ या ऐतिहासिक मराठी नाटकाच्या प्रथम प्रयोगाने रसिकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखन माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विधानपरिषद आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी केले असून, प्रशांत निगडे यांनी दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
या नाटकाची निर्माती शारदा राजकुमार बडोले असून, सहनिर्माते गणेश कू. मोडक आहेत. समीर सूर्ये यांनी निर्मिती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. नाटकाच्या संशोधन व सल्लागार म्हणून डॉ. संदीप वाघ, तर सूत्रधार म्हणून संतोष महाडिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नाटकाची दृश्यात्मक मांडणी अधिक प्रभावी करण्यासाठी सुनील पांचाळ आणि त्यांच्या टीमने नेपथ्य, मिनार देशपांडे यांनी संगीत, सुनील मेळी यांनी प्रकाशयोजना, सुप्रिया वाघ यांनी वेशभूषा, मिलिंद कोरटेकर यांनी रंगभूषा, पार्थ पवणे यांनी ध्वनी संयोजन, योगेश माळकंडे यांनी लेखन सहाय्य, तर अनिश काकडे, निरंजन जोशी आणि आनंद कोंकेर यांनी रंगमंच व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *