हरवलेले २९ मोबाईल शोधून देवरी पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन; सायबर सेल व सीईआयआर पोर्टलची मदत

Share on

वार्ताहर : Jayashri | विदर्भ

देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले २९ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून देवरी पोलिसांनी ही कामगिरी बजावली आहे.

सायबर सेल आणि सीईआयआर पोर्टलचा वापर

प्राप्त माहितीनुसार, परिसरातील नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्याबाबत देवरी पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी केंद्र सरकारच्या सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि जिल्हा सायबर सेलची तांत्रिक मदत घेतली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून गहाळ झालेले २९ अँड्रॉइड मोबाईल हस्तगत केले.

विशेष कार्यक्रमात मोबाईलचे वाटप

शोधण्यात आलेले मोबाईल संबंधितांना देण्यासाठी देवरी पोलीस ठाण्यात एका विशेष 'मोबाईल वितरण कार्यक्रमा'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमगाव उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा देवरीचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या नंदिनी चानपुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना त्यांचे फोन सुपूर्द करण्यात आले. स्वतःचे गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व तपास पथक

ही शोधमोहीम गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, गोंदिया कॅम्प देवरीचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

या कारवाईत देवरीचे पोलीस निरीक्षक गणेश कृष्णा वनारे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक हर्षा भोग, महिला पोलीस नाईक लता राजोंभोज, पोलीस शिपाई मो. अन्सार इकबाल कुरेशी आणि महिला पोलीस शिपाई सुरेखा सोनवाने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *